माणूस झालाय दगडं...
दगडं...
माणूस झाला दगड, दगड झाला देव.
माणुसकी आता जरा बाजूलाच ठेव
पडतोय त्याला पडू दे मरतोय त्याला मरू दे
वाचवण्याचं सोंग घेऊन कोणी दागिनेच चोरू दे
लोकल च्या टायमिंग वर लक्ष तू ठेवं
पण माणुसकी आता जरा बाजूलाच ठेव
बघणार्यांना मरण आता मोबाईल मध्ये टिपू दे
सोशल मीडिया वर थोडं त्यांना सोशल वर्क करू दे
लाईक शेअर करून कमेंट मात्र तू टाकून ठेव
सोड ना गरबा खेळ जाऊन माणुसकी जरा बाजूलाच ठेव
नवस किती केले होते रंग नऊ वेगळे होते
शेवटचाच रंग का नाही भावला राक्षस त्या दिवशी असा का धावला
चिरडल गेलं क्षणात सर्व म्हणून प्रशासनाला तू मुस्काडीत ठेव
अरेरे दसऱ्याची खरेदी राहूनच गेली आता तरी माणुसकी बाजूलाच ठेव
गर्दी मधल्या अफवांना उधाण आता येऊ दे
धडकी भरून कोणाला तरी कोलमडून पडू दे
अफवेच्या धुराळा हवेत उडवून ठेव तीच बातमी बघायला मात्र टीव्ही तू लावून ठेव
टीव्हीवर जाहिरात येताच चहा भजी ऑर्डर कर माणुसकी काय असते तिला जरा बाजूलाच ठेव
पाच लाख देण्यापेक्षा एक लक्ष माणसांकडं दे
त्याच वोट घेऊन झालं आता त्याच्या आयुष्याचाच घोट घे
सर्व काही कळून सुद्धा कसायाच्या हातात मान तू ठेव
आता पर्यन्त वाचलायस ना मग माणुसकी आता पण बाजूलाच ठेव
दसऱ्याच्या निमित्ताने रेल्वे चा डब्बा सजवून घे
मृत्यूच्या आकड्यावर सर्वांच्या नजर खिळू दे
तुझ्या ग्रुप मधला नाहीना कोणी याची खात्री तू ठेव
मैत्री यालाच तर म्हणतात असं म्हणत माणुसकी तू बाजूलाच ठेव
मुंबईच्या गर्दीत मूंबईला तरी श्वास घेऊ दे
दुखवट्याचा मुखवटा काढ आता ह्यातून काहीतरी शिकून घे
आता तरी जागा हो तू झोप तुझी उडवून ठेव
माणसातला माणूस तू माणुसकीला थोडी जागा ठेव
खरच माणूस बनतोय दगड, दगडात शोधतोय देव.
माणुसकी वाचवेल तुला तुझ्यात माणुसकी थोडी ठेव
--------------------------------------------------------------
राजन गायकवाड
Comments