कधी अचानक...

कधी अचानक...

कधी अचानक स्वप्नांमध्ये
डोकावून जातात आठवणी हसता हसता
डोळे उघडता स्वप्न मोडते
सत्य उमगते बघता बघता

कधी अचानक आभाळ दाटते
पावसाची चाहूल लागताना
सूर्याला सुद्धा जाग येते मग
उन्हात पाऊस बघितला पडताना

कधी अचानक जुन्या मित्रांच्या
गप्पा लागतात रंगायला
कोणाच्या तरी नसण्याची
खंत सलत असते मात्र मनाला

कधी अचानक श्वास फुलतो
गळा गहिवरतो क्षण तो सारा बघताना
आठवण होते जेव्हा हीच ती माझी शाळा
शाळेच्या आवारात घंटेचा आवाज ऐकताना

कधी अचानक चालता चालता
मागे वळून बघताना
दिसतो मला मीच त्या मैदानात
मित्रांसोबत शर्यत लावताना

कधी अचानक दिसतो मी मला तिच्या सोबत
अंगणात हसत खिदळत खेळताना
आता बघितलं कडेवर तिच्या चिमुकल्याला
काऊ चिऊचा घास भरवत खेळवताना

कधी अचानक आठवत मला
आईचा तो अभ्यास माझा घेताना
आणि चुकल्यावर मात्र बापासमोर
पाय दुःखे पर्यंत ओणव उभं राहताना

कधी अचानक समजून घेतो
मी स्वतःला सावरताना
मीच कदाचित वाहून जातो
जुन्या आठवणीत रमताना ....

----------------------------
लेखक - राजन गायकवाड

Comments

Popular posts from this blog

हडळ (भुताटकी कथा भाग १)

हडळ (भुताटकी कथा भाग २)

हडळ (भाग ३)